Tuesday, July 22, 2025

पुनरागमनायच

 पुनरागमनायच

🙏🏻
....................................................
सकाळी नऊ म्हणजे ठीक नऊ च्या ठोक्याला विश्रामबाग वाड्याच्या चौकात ज्ञानाप्रबोधिनीच्या "श्री गजाननाचा" रथ लागलेला असतो... प्रबोधिनीचे साधारण 500 विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी असे सर्व मिळून आधीच ठरल्याप्रमाणे आपापल्या जागा घेतात. ढोल ताशा पथक, ध्वजपथक, लेझीम पथक, बरची पथक श्रींना निरोप द्यायला सिद्ध असतात. पथक प्रमुख शेवटच्या सूचना देऊन आपापल्या जागा घेतात. पाचवी ते दहावी च्या मुलांमुलींचा कल्लोळ चालू असतो.
ठीक 9.30 च्या ठोक्याला सावधान ची सूचना येते आणि भर कुमठेकर रस्त्यावर इतका वेळ चाललेला गोंगाट एका क्षणात थांबतो. फक्त एका शिट्ट्टीवर सुमारे 700-800 आजी माजी विद्यार्थी स्तब्ध उभे रहातात. ध्वज उलगडले जातात..
ध्वजनमस्ते 1,2,3.... जोडलेले हात,झुकलेल्या माना
आणि पुढच्या सेकंदाला ताशा, लेझीम आणि बरची यांचा एकत्र गजर....
टचकन डोळ्यात पाणी येतं...
……………………...........................
गेल्या वर्षी ज्ञानप्रबोधिनी विसर्जन मिरवणूकीवर हा लेख लिहिला होता तेव्हा पुढच्या वर्षी आपण या मुरवणूकीचा भाग असू अशी स्वप्नांत सुद्धा कल्पना केली नव्हती.
पण ज्ञानप्रबोधिनी फक्त विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाहीत तर त्यांच्यासोबत पालकांना पण शाळेत प्रवेश देते, शाळा परिवाराचा भाग बनवते हे आता पक्कंच लक्षात आलंय.
या वर्षी जुलै मधेच माता पालक बरची गटासंबंधी सूचना आल्या आणि पुढचा मागचा काहीच विचार न करता लगेच गटात सामील झाले. दर शनिवारी सकाळी 8 ते 10 बर्ची सराव शाळेच्या गच्चीवर सुरु झाला. प्रबोधिनी च्या काही माजी विद्यार्थिनी आणि आता पालक झालेल्या काही आमच्यातल्याच ताया यांनी पुढाकार घेऊन सराव घ्यायला सुरुवात केली.
पहिले दोन तीन सराव झाले तेव्हा खरंतर जरा दडपण आलं होतं. झेपेल का हे आपल्याला ? साधारण 35 ते 45 वयोगटातल्या सगळ्या आया. सलग दोन तास बाप्पा पुढे बरची नृत्य करायचं आहे तेसुद्धा 5 वी ते 10 वी च्या आमच्याच सुपर ऍक्टिव्ह मुलामुलींसोबत. जमेल का आपल्याला ?
बर्ची हे शिवकालीन शस्त्र. थोडक्यात सांगायचं म्हणजे भल्याचं टोक. आता खरे भाले घेऊन नाचू शकत नाही म्हणून टिपऱ्यांसारखे पण थोडे जड दंड घेऊन हा नृत्यप्रकार प्रबोधनी मध्ये बसवला जातो.दोन्ही हातात दंड घेऊन वेगवेगळे प्रकार केले जातात. शिस्तबद्ध आणि डौलदार पणे हातापायाच्या हालचाली सलग दोन तास करायच्या.
सुरुवातीला सलग 10-15 मिनिटे केलं तरी दम निघायचा. पण प्रोत्साहन द्यायला सतत ताया होत्याच. छान करताय, मस्त होतंय, जमेल आपल्याला असं सतत सांगत आमच्या चुका सुधारत सलग 15 मिनिटे ते सलग 35 मिनिटे अशी आमची प्रगती होत होती. कधी प्रेमाने कधी दटावून, चुकणाऱ्या पोरींना सांभाळून घेऊन या सगळ्या तायांनी आमचा गट छान तयार केला. आवर्जून नाव घ्यायचं झालं तर अनुजाताई गोडबोले, आरतीताई साठे, प्रत्युमाताई कामत, मानसीताई, भाग्यश्रीताई, शिवालीताई यांनी स्वतः चे सगळे व्याप सांभाळून आम्हाला तयार केलं. आणि मग आला सगळ्यात महत्वाचा भाग... ढोल पथकासोबत सराव 😜
इतके दिवस 1-2-3-4-5-6-7-8, 1-2-3-4-5-6 अशा आकड्यांवर जोरदार नाचणाऱ्या आम्ही आया पहिल्याच ढोल सरावाला भांबावलो. ढोलासोबत आकडे जुळेनात आणि सगळ्याच गमतीजमती व्हायला लागल्या.नेमकी या दरम्यान जोरदार ताप सर्दी खोकल्याने मी आजारी पडले. त्यामुळे पहिल्या 3 ढोल सरावाला जाताच आलं नाही.पण सरावात होणाऱ्या गमतीजमती गटावर कळत होत्या. ढोलासोबत सरावाला याच ते गरजेचं आहे असा आग्रह होत होता. अशातच रंगीत तालीम जाहीर झाली आणि ढोलासोबत सरावाला गेलंच पाहिजे असं ठरवलं. शनिवारी रंगीत तालीम आणि शुक्रवारी संध्याकाळी एस एम जोशी पुलाखाली अंगात 100 ताप घेऊन पोचले.मी नाचू शकेन कि नाही माहित नव्हतं पण निदान बघू तरी बाजूला बसून म्हणून गेले होते. पण ढोल आणि ताशावर पाहिली तर्री पडली आणि ताप विसरले. पुढची 45 मिनिटे मस्त नाचले आणि बाप्पाच्या कृपेने ताप पण पळून गेला.
दुसऱ्या दिवशी BMCC मध्ये संपूर्ण युवती विभागासोबत जी रंगीत तालीम झाली तेव्हा पहिल्यांदाच आम्ही सलग 1 तास नाचलो. आता माता पालक गट बर्ची साठी सज्ज होता.
बाप्पांचं आगमन झालं आणि पहिल्या बर्ची प्रात्यक्षिकाचं निमंत्रण मिळालं ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळामध्ये. घरचे गौरी गणपती सांभाळत आम्ही सगळ्याजणी या प्रात्यक्षिकाला पोचलो. एक तास मस्त नाचलो. गजाननासमोर मंडपात नाचताना वेगळीच ऊर्जा जाणवत होती.हा अनुभव खरंतर मला अजिबात शब्दात व्यक्त करता येणार नाही.
त्यानंतर काल विसर्जन मुरवणुकीत संपूर्ण शाळेसोबत कुमठेकर रस्त्यावर विश्रामबाग वाडा ते जोंधळे चौक अशा दोन तास बर्च्या केल्या ( बर्च्या केल्या हा प्रबोधिनीचा खास शब्द आहे 😜 ) आम्हाला बघायला उत्साहाने आलेले आप्तस्वकीय, मित्रमंडळी यांच्या चेहेऱ्यावर दिसणारं कौतुक सुखावून जात होतं. मुलांसोबत त्यांच्या बरोबरीनं शाळेचा गणवेश घालून नृत्य करतोय ही भावना मस्तच होती. नथ,फेटे असा कोणताही साजशृंगार न करता अत्यंत साधेपणाने पण अतिशय देखणी मिरवणूक कशी असावी याचा वस्तुपाठ ज्ञानप्रबोधिनी शाळेने गेली अनेक वर्षे घालून दिला आहे. आमच्या मुलांमुळे आम्ही याचा भाग होऊ शकलो याचा मनापासून आनंद आहे. आपली मुलं आपल्याला नकळत किती सुंदर अनुभव देत असतात त्यापैकी हा सगळ्यात मौल्यवान अनुभव म्हणावा लागेल. आमच्यातल्या काही उत्साही आयांनी तर रात्री युवती विभागासोबत विविध गणपती मंडळांमध्ये परत दोन तास बर्ची नृत्य केलं.
काल सकाळी जोंधळे चौकात मिरवणूक संपन्न झाल्यावर आरती आणि मंत्रपुष्प झालं.
त्वमेव माता च पिता त्वमेव
त्वमेव बंधू च सखा त्वमेव
म्हणताना डोळे कधी गळायला लागले कळलंच नाही. समोर दिसणाऱ्या बाप्पाला मनापासून हात जोडले. हे सगळं खरंतर 'त्याने' करून घेतलंय याची तीव्र जाणीव झाली. मी केलं, आम्ही केलं हे जे काही 'माझं माझं मी मी' म्हणतोय ते खरंतर त्याचं आहे. त्याने दिलेलं आहे. त्यानं करून घेतलेलं आहे. त्याच्याप्रती कृतज्ञता कशी व्यक्त करायची ?
निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी
आम्ही सर्वांनी तुझी सेवा करायचा छोटासा प्रयत्न केला. पुढच्या वर्षी अजून उत्साहाने तुझं स्वागत आणि सेवा करायची संधी दे
पुनरागमनायच 🙏🏻
-©️स्मिता श्रीपाद
अनंतचतुर्दशी 2023

No comments:

Post a Comment