कुमाऊंच्या प्रदेशात -3...लष्करी शिस्तीचं रानीखेत
काल सगळे ऋतू एकाच दिवसात अनुभवल्यावर आज सकाळी अगदी लख्ख उन्ह आणि स्वच्छ आकाश दिसलं. परत एकदा नवीन उत्साहाने बाहेर पडलो. आज आधी कैची धाम आणि मग रानीखेत असा प्लॅन होता.
रानीखेत भवाली पासून 1:30 - 2 तासांवर आहे. गाडीत बसल्या बसल्या आज अंताक्षरी खेळायची टूम निघाली. ताबडतोब दोन गट करून अंताक्षरी सुरु झाली. सगळेच जण उत्साही त्यामुळे अंताक्षरी मस्त रंगली. गाण्यांच्या नादात कैची धाम कधी आलं समजलं पण नाही.
उत्तराखंड मध्ये निंब करोरी बाबा उर्फ कंबलवाले बाबा याना लोक खूप मानतात. त्यांना हनुमानाचा अवतार समजलं जातं. त्यांनी स्थापन केलेलं कैची धाम हे एक मंदिर आहे. दोन डोंगरांच्या खाचेत वसलेलं असल्याने याला कैची धाम असं म्हणतात.मंदिराच्या शेजारून एक नदी वहाते पण आता उन्हाळ्यामुळे ती पार कोरडी होती. आजूबाजूला हिरवेगार डोंगर आणि मध्ये हे मंदिर आहे. निंब करोरी बाबांच्या दर्शनाला खूप सेलिब्रिटी नेहेमी येतात. अगदी स्टिव्ह जॉब्स, मार्क झुकरबर्ग पासून विराट कोहली, अनुष्का शर्मा पर्यंत मंडळींनी इथे हजेरी लावलेली आहे आणि बाबांना गुरु मानलेलं आहे असं समजलं.
मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आलो तर आमच्यासाठी इकडचं खास पेय शिकंजी तयार होती. मला अनेक वर्ष शिकंजी म्हणजे दूध आणि फळांचं पेय असेल असं वाटायचं पण हे वेगळंच होतं. लिंबू, तिकडे सध्या मिळणारे रसरशीत ईडलिंबू, पुदिना, जलजिरा, काळं मीठ असं सगळं घातलेलं हे अगदी मस्त रिफ्रेशिंग असं पेय होतं.शिकंजी घेऊन तरतरीत होऊन पुढे निघालो.
आता रानीखेत चा सुंदर रस्ता सुरु झाला. उंच कडे, खोल दऱ्या आणि त्यात सुकलेल्या नद्या असं चित्र दिसायला लागलं. या नद्यांची पात्रं प्रचंड होती. त्यामुळे पावसाळ्यात त्या जेव्हा भरून वाहत असतील तेव्हा काय सुंदर दिसत असतील असं वाटून गेलं. रानीखेत इथे कुमाऊं रेजिमेंट, नागा रेजिमेंट यांचं मुख्यालय आहे. हे गाव लष्कराच्या आखत्यारित येतं.आम्ही सगळ्यात आधी कुमाऊं रेजिमेंट च्या संग्रहालयाला भेट दिली. निसर्ग आणि शिस्त एकत्र आले कि काय जादू होते ते इथं गेल्यावर कळतं. लष्कराच्या टुमदार इमारती, आजूबाजूला पसरलेले डोंगर, भर उन्हाळ्यात पण भरपूर हिरवाई, उत्तमपणे राखलेलं लॉन असं देखणं चित्र दिसत होतं.
आम्ही पोचलो तेव्हा इथे थोडी गर्दी होती. आधीचा ग्रुप आत होता. त्यांचं होईपर्यंत आजूबाजूच्या सुंदर परिसरात फोटोसेशन करून घेतलं. तरी सुद्धा वेळ उरला म्हणून मग समस्त महिला वर्गानं सध्याचं लोकप्रिय रिल करायच्या निमित्तानं जरा हातपाय हलवले. आमचे उद्योग बघून एखादा सैनिक येऊन आम्हाला हाकलून लावतो कि काय अशी भीती वाटत होती पण तसं काही झालं नाही.
इथल्या संग्रहालयात कुमाऊं रेजिमेंट ने आत्तापर्यंत केलेल्या कामगिरी च्या आठवणी जपल्या आहेत. युद्धात वापरलेली शस्त्र, शत्रूंच्या पकडलेल्या वस्तू, कुमाऊं रेजिमेंट च्या पराक्रमी योध्यांबद्दल माहिती असं बरंच काही इथे आहे. एक रिटायर्ड मेजर हे सगळं आपल्याला दाखवतात. खरंतर बारकाईनं बघायला इथे खूप काही आहे पण तितका वेळ नव्हता. मेजरसाहेब पण प्रत्येक गोष्ट न दाखवता निवडक महत्वाच्या गोष्टी दाखवत होते.
रानीखेत मध्ये शिरल्यापासून आभाळाशी स्पर्धा करणारी उंचच उंच पाईन ची झाडं दिसत होती. हिंदी चित्रपटांमध्ये या अशा जंगलात चित्रित केलेली गाणी नेहेमी असतात. अशा एका जंगलात आता आमचा फोटो स्टॉप होता. तिथे जाताना रानीखेत मधलं प्रसिद्ध गोल्फ कोर्स दिसलं. पूर्वी तिथे जाता यायचं पण सध्या पर्यटकांसाठी ते बंद आहे. फोटो आणि रील बनवून जेवायला पोचलो.
एक छोटंसं टुमदार हॉटेल आणि त्याच्या गच्चीमधून दिसणारी विस्तीर्ण पर्वत रांग असा नजारा बघत आज स्थानिक पहाडी जेवण केलं. त्यातला मोहरी वाटून केलेला पहाडी रायता मस्त होता. तिथेच थोडावेळ आराम करून नैनिताल च्या दिशेने परतीचा प्रवास सुरु केला.
भरपुर फिरून आणि आता जेवण करून झोप आली होती. आमचं हॉटेल येईपर्यंत मस्त झोप झाली. आता चहाची फार गरज होती. हॉटेल वर उतरून थेट चहा साठी डायनिंग हॉल मध्ये गेलो तेव्हा गरम गरम बटाटे वडे आमची वाट बघत होते.थंडगार हवेत चहा आणि मुंबईकर शेफ ने बनवलेले वडे एकदम माहौल बनला.आज संध्याकाळी गेम्स नाईट होती. उद्या इथून चेकआऊट करायचं होतं. त्यामुळे रूममध्ये जाऊन सामान पॅक करून पटापट यावरून गेम्स खेळायला गेलो.
लहानपणी खेळलेले साधे सुधे गेम्स पण अभिषेक ज्या पद्धतीने ते करवून घेत होता, जबरदस्त मज्जा आली. सुरुवात 'कच्ची पपई पक्की पपई' पासून झाली. आधीच थंडी ने जीभ जड झालेली त्यामुळे हा खेळताना जबरदस्त त त प प होत होतं. त्यानंतर 'हनुमान कृष्ण नरसिंह' असा एक खेळ घेतला. सगळ्यांनी गोलात उभं राहायचं आणि मध्ये उभा असलेला माणूस गोलातल्या कोणाकडे हि बोट दाखवणार आणि एका देवाचं नाव घेणार कि लगेच त्यानं त्या त्या देवाची पोझ घेऊन उभं राहायचं असा खेळ होता. या खेळात तर हातात गदा घेतलेला कृष्ण किंवा नरसिंह सारखं पोट फाडणारा हनुमान असे बरेच नवे देव आम्ही शोधून काढले. हसून हसून पोट दुखायला लागलं. मंडळी पार जमिनीवर लोळायला लागली तेव्हा गेम संपवून जेवायला गेलो.
नेहेमीप्रमाणेच चवदार जेवून रूमवर पोचलो.उद्या कॉर्बेट ला जायचं होतं.
-
स्मिता श्रीपाद

No comments:
Post a Comment