Tuesday, July 22, 2025

***आठवणींचा भोंडला***

 ***आठवणींचा भोंडला***

"मधुजा आज डबा अर्धाच का खाल्लास ?"
"वेळ मिळाला नाही. भोंडल्याचं बोलत होतो.आमच्या वर्गाला गोड खिरापत करायला सांगितली आहे.१० वी च्या ताया आलेल्या त्या सुचना देत होत्या."
"अगं पण उपाशी राहुन कसली चर्चा ?"
"..आणि आमच्या शाळेत ना दरवर्षी एकमेकांची खिरापत फोडायची आणि स्वत: ची लपवायची अशी मजा असते.भांडाभांडी पण होते. "
लेकीची बडबड संपतच नव्हती. भोंडला , खिरापत शब्द ऐकल्यावर मला पण उत्साह संचारला.
"तुला येतात का गाणी ? "
"हो येतात की. आपण करतो की कधीकधी वर टेरेस वर भोंडला तेव्हा ऐकली आहेत मी"
त्यादिवसापासुन मनात भोंडला सुरु झाला. सगळ्या आठवणी फेर धरुन नाचायला लागल्या. आता लिहिल्याशिवाय पर्याय नाही मला ☺️
"सरस्वती अपार्ट्मेंट्स, कराड"
वर्ष साधारण - १९९३-१९९४
नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासुन शेवटच्या दिवसापर्यंत न चुकता बिल्डींग मधल्या तमाम मैत्रिणींच्या घरामधे आम्ही भोंडला करायला जायचो. पाटाच्या मागच्या बाजुला किंवा दगडी पाटीवर हत्ती काढायचा तो शेवटच्या दिवसापर्यंत तसाच ठेवायचा. हॉल च्या मध्यभागी हत्ती, त्याला एखादं फुल, आणि आज किती गाणी म्हणायची त्याच्या खुणा/रेषा ओढुन ठेवायच्या. एक गाणं झालं की रेष पुसायची.
पहिल्या दिवशी १ च गाणं.त्यात ऐलमा पैलमा बाय डीफॉल्ट + १ + खिरापतीचं गाणं अशी ३ गाणी पहिल्या दिवशी आणि नवव्या दिवशी ऐलमा पैलमा + ९ + खिरापतींचं गाणं असं असायचं.
एक घर झालं की दुसरं.संध्याकाळी ७ ते ९ हेच. खिरापती हेच जेवण व्हायचं.
ऐलमा पैलमा गणेश देवा,
माझा खेळ मांडु दे करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडला वेशीच्या दारी,
पारवळ घुमतय बुरुजावरी
....
...
आमच्या आया तुमच्या आया,
खातील काय दुधोंडे
दुधोंड्यची वाजली टाळी,
आयुष्य दे रे वनमाळी
माळी गेला शेताभाता,
पाउस पडला येताजाता
पड पड पावसा थेंबोथेंबी,
थेंबोथेंबीच्या आडव्या लोंबी
पिवळ्या लोंबी आणुया,
तांदुळ त्याचे कांडुया
मोदक-लाडु बनवुया,
श्रीगणराया अर्पुया.
अधल्या मधल्या ओळी विसरलेल्या असायच्या त्या ९ व्या दिवसापर्यंत पक्क्या व्हायच्या.
गणरायाला पहिला नमस्कार घातला की लगेच यायचे लिंबु.
"एक लिंबु झेलु बाई दोन लिंबु झेलु
.....
....
सोनारदादा सोनारदादा,
बाळाच्या बिंदल्या झाल्या की नाही
आज नाही उद्या या"
या गाण्याची आणि माझी एक गंमत आहे. मी नेहेमी "बाळाच्या पाटल्या झाल्या का नाही" असं म्हणायचे आणि भोंडला म्हणायच्या उत्साहात बाकी जणी काय म्हणत आहेत याकडे कधी लक्षच दिलं नाही मी.बिंदल्या हा शब्द कळूनसुद्धा त्याचा अर्थ च माहिती नसल्यामुळे बाकी सगळे काहीतरी चुकीचं म्हणत आहेत. पाटल्याच शब्द बरोबर आहे पण बाळाला कोण पाटल्या करत असेल ? असेल बुवा कोणीतरी तालेवार , किंवा पूर्वीच्या काळी करत असतील अशी मी माझ्या मनाची समजुत करुन ठेवली होती आणी रेटुन चुकीच म्हणत असायचे.
पुढे अनेक वर्षानी, मधुजा झाली तेव्हा तिच्या बारशाच्या वेळेला आजी म्हणाली की मी बाळाला बिंदल्या करुन आणल्यात बघ. बिंदल्या म्हणजे काय बघु ग म्हणुन पाहिलं तेव्हा एकदम क्लिक झालं की अरेच्चा " बाळाच्या बिंदल्या झाल्या का नाही" त्यातल्या बिंदल्या म्हणजे हे का ? बराच वेळ एकटीच हसत बसले होते तेव्हा.
असो. बरचं विषयांतर झालं. आता परत भोंडल्या कडे येउ.
तर लिंबु झेलुन झाले की यायचे शिवबा.
शिवाजी आमुचा राजा,
त्याचा तो तोरण किल्ला
तोरण किल्ल्यात सात विहिरी,
सात विहिरीत सात कमळे
एक एक कमळ तोडीले,
भवानी मातेला अर्पिले
भवानी माता प्रसन्न झाली,
शिवरायांना तलवार दिली
तलवार घेउनी आला,
हिंदुंचा राजा तो झाला
हिंदुनी त्याचे स्मरण करावे,
हादग्यापुढे गाणे गावे.
इथवर आलं की पुढे काय ते सुचायचं नाही पटकन. एक क्षण शांतता. ईतक्यात एकजण
"श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेड माझ्या नशीबी आलं"
चं दळण सुरु करायची आणि माझी भयानक चिडचिड व्हायची. हे गाणं मला अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही. अजुनही. उगीच ती वेड्याची बायको काय काय करायची आणी वेडा सगळी वाट लावायचा.त्यात आणि शेवटी वेडा त्याच्या बायकोला झोपलेली असताना मेली असं समजुन जाळुन टाकायचा. काय च्या काय. ईतक्या मस्त देवाच्या भोंड्ल्यात हे कसलं डीप्रेसिंग गाणं ग बाई.
कसं तरी रेटुन हे गाणं संपलं की माझं आवडतं गाणं मी सुरु करायचे.
अक्कणमाती चिक्कणमाती,
खळगा तो खणावा
अस्सा खळगा सुरेख बाई,
जातं ते रोवावं
अस्सं जातं सुरेख बाई,
सपिटी दळावी
अश्शी सपिटी सुरेख बाई,
करंज्या कराव्या
अश्श्या करंज्या सुरेख बाई,
तबकी ठेवाव्या
अस्सं तबकं सुरेख बाई,
शेल्याने झाकावं
अस्सा शेला सुरेख बाई,
पालखी ठेवावा
अश्शी पालखी सुरेख बाई,
माहेरी धाडावी
अस्सं माहेर सुरेख बाई,
खेळाया मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई,
कोंडुनी मारीतं
सुंदर चित्रदर्शी वर्णन... भक्कम दगडी जातं, सुरेख मुरड घातलेल्या करंजा, सुंदर चांदीचं तबकं, त्यावर रेशमी जांभळा किंवा लाल शेला, नक्षीदार कनाती, लोड गाद्या असलेली पालखी.... असं सगळं चित्रं दिसायलाच लागायचं मला लहानपणी... माझं अतिशय आवडतं गाणं..
अस्सं माहेर सुरेख बाई...असं आता म्हणताना डोळे ओले होतात आणि आईची आठवण येते.. पण सासर द्वाड नाहिये आणि सासुबाई आईची माया लावतात.🤗
अजुन एक गमतीचं पण मला न आवडणारं गाणं म्हणजे झिप्र्या कुत्र्याचं...
अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं, परडी एवढं फूल गं, दारी मूळ कोण गं
दारी मूळ सासरा
सास-याने काय आणलंय गं
सास-याने आणल्या पाटल्या
पाटल्या मी घेत नाही सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लावा गं बाई लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई सोडा गं बाई
तर मूळ म्हणजे पूर्वी लेकीला परत सासरी न्यायला जो माणुस यायचा त्याला मूळ आलंय असं म्हणायचे. तर या बाईला न्यायला सासरे, सासु, दीर, जाउ कोण कोण येतात ते पण भारी पैकी दागिने वगैरे घेउन तर जात नाही ते नाहीच आणि वर त्यांच्या अंगावर कुत्रं सोडते म्हणे आणि मग नवरा आला की गप चालायला लागते.
बहुतेक सासरच्यांवर वैतागलेल्या एखाद्या सासुरवाशीणीने लिहिले असेल
या सगळ्या गाण्यांशिवाय अजुन अनेक गाणी मला अजुनही सगळीच्या सगळी पाठ आहेत.
श्रावणी सोमवार आला, चला जाउ रामेश्वराला...
हरिच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली....
कारल्याचा वेल लाव ग सुने, मग जा आपल्या माहेरा..
कृष्ण घालितो लोळण, आली यशोदा धावून..
नणंदा भावजया दोघी जणी...
इथे लिहित बसले तर लेख ४-५ पानी होइल.त्यामुळे आता बास.
तर गाणी गाउन झाली की मुख्य मुद्दा. खिरापत.
आड बाई आडवणी,
आडाचं पाणी काढवणी
म्हणत एकदाचं.. आमचा भोंडला संपला असं म्हणायचं
आणि मग
दारी अंब्याची कोय ग,
खिरापतीला काय ग ?
घरात काय वास येत आहेत त्याचा अंदाज घ्यायचा. गोड आहे की तिखट विचारायचं आणि मग गेसिंग गेम ऑन.
"श्रीबालाजीचीसासु" पासुन सुरुवात करायची.
सगळ्या काकु कोणत्या पदार्थात पारंगत आहेत हे माहिती असायचं त्यामुळे त्यांचा हातखंडा पदार्थ बरेचदा असायचा. कधी लाडु, वड्या असा कोरडा खाउ, चिवडा, भडंग हे पण असायचे. कधी पेरु, सफरचंद अशी चिरलेली फळं, दडपे पोहे , उपमा, थालिपीठ, तिखट मिठाच्या पुऱ्या, घाऱ्या असे अनेक पदार्थ.
एकदा एका काकूंनी केलेली खिरापत ओळखताच येईना. येत असलेले नसलेले सगळे पदार्थ सांगून झाले. अपेक्षा फारच वाढल्या आमच्या आणि शेवटी सगळ्या हरलो तेव्हा चिमुकल्या डब्यात तुटीफ्रूटी घेऊन आल्या त्या आणि सगळ्यांच्या हातावर 4-4 तुकडे ठेवले.. सगळ्यांची तोंडं पडली होती. हा हा हा. अजून आठवलं की हसायला येतं. पण नंतर त्यांनी कशी गंमत केली असं म्हणुन सुंदर वडी हातावर ठेवली होती.
आमची एक मोठी ताई होती तिनं एकदा शेवटच्या दिवशी सगळ्यांना शेवटी बोलावून पोटभर मुगाची चवदार खिचडी आणि टोमॅटो सार खाऊ घातलं होतं.
भिजलेली हरबरा डाळ घालून साबुदाणा खिचडी असा एक डेंजर प्रकार 'वेगळी' खिरापत म्हणून खायला घातला होता कोणीतरी.😜
भोंडला म्हणजे मेमरी गेम, चित्रकला, गायन कला आणि पाककला या सगळ्यांचं प्रात्यक्षिक असायचं असं म्हणायला हरकत नाही.
दसरा संपला की कोजागिरी ला परत एकदा सगळे टेरेस वर जमायचो आणि आजच्या भाषेत पॉटलक असायचं. तेव्हा बाकी घरोघरीचे बाबा आणि दादालोक पण असायचे जेवायला.
मधुजा च्या भोंडल्या मुळे या सगळ्या आठवणी आल्या आणि परवा मला अचानक भोंडल्याचं एक गाणं आठवलं.माझ्या आईंच एक अतिशय आवडतं गाणं जे आमच्या बिल्डींग मधे फक्त तिलाचं यायचं आणि सगळ्या जणी शेवटच्या दिवशी आग्रहाने तिला म्हणायला लावायच्या.
"गाऊ गजगौरीचं गाणं, घालु रिंगण"
कौरव पांडव यांचा संदर्भ असलेलें हे गाणं.. त्यात कुंती आणि गांधारी ला गजगौरीचं व्रत करण्यासाठी आणि नंतर वाण देण्यासाठी हत्ती हवा असतो.तर पांडव थेट स्वर्गात जाउन ईंद्राचा ऐरावत आणतात त्यांच्या आईसाठी असं वर्णन आहे.
गुगल वर शोधलं तर कुठे सापडेना. मग माझ्या आईच्या सगळ्या माम्या, मावशा आणी माझ्या मावशांना कामाला लावलं. काल रात्री ११ वाजता सासुबाईंना हे गाणं आठवलं आणि सकाळी त्यांनी मला लिहुन आणि रेकॉर्ड करुन पाठवलं. पण तरी ते अपुरं होतं. मग जेवढं आठवतय तेव्हढं आज मी मायबोली.कॉम वर पोस्ट केलं आणि तिथे कोणाला माहिती असेल तर पूर्ण करायला सांगितलं. तिथल्या एकीला एका ब्लॉग वर हे संपूर्ण गाणं सापडलं. हेच ते माझ्या आईचं आणि माझं पण लाडकं गाणं.
गाऊ गजगौरीच गाणं, घालू रिंगण
गाऊ गजगौरीच गाणं, घालू रिंगण
कौरव भाऊ सर्व मिळोनी
करिती हत्ती माती आणोनि
गांधारीला वरी बसवोनी
वाटीयली वाणे...1
कुंतीला ते दिधले वाण
दुर्योधन बोले टोचून
तुम्हास आहे नशिबी कोठून
असले या जगती....2
माता कुंती कष्टी जाहली
भीम पुसे मग येऊन जवळी
शोक कशाचा चिंता कसली
सांग सांग आई.....3
सांगे वाणाचा वृत्तांत
भीम कोपला मग चित्तात
अणितो हत्ती म्हणे क्षणात
आला नदीतीरी...4
चिखल करी मग खळे खणोनी
फेकी भराभर गोळे करुनी
गेल्या वेशी सर्व बुजोनी
घडला आकांत...5
अर्जुन बोले मग भीमाला
खटाटोप हा उगीचकशाला
मागु ऐरावत इंद्राला
वाटाया वाणे.....6
बाणांचा मग जिना रचिला
भीम वरी स्वर्गात निघाला
इंद्राला वृत्तांत कळाला
झाला दुश्चित......7
इंद्र म्हणे हे अरिष्ट आले
म्हणोनी कपट इंद्राने केले
दारच स्वर्गाचे लावीयले
आवळोनी घट्ट ....8
भीमे केला गदाप्रहार
स्वर्गाचे मोडियले द्वार
आला इंद्राजवळी वीर
बोले इंद्राला....9
भीमसेन बोले इंद्राला
गजगौरीचे व्रत आईला
ऐरावत पाहिजे आम्हाला
वाटाया वाणे.....10
इंद्र म्हणे स्वर्गीचा हत्ती
द्यावा कैसा भूमीवरती
नेणे तरी तो कवण्या रीती
नेऊ जरी म्हटले.....11
त्यातच आहे मत्त जाहला
धजे न कोणी धरावयाला
मग तो येईल कसा तुम्हाला
न्यायाला खाली....12
आधीच चिडविला होता हत्ती
धावून आला भीमावरती
गदा प्रहारे जीरवी मस्ती
भीमसेन तेव्हा......13
हत्ती पळतो ची ची करोनी
भीम ओढीतो सोंड धरोनी
मुटकूळ त्याचे मग बांधोनी
टाकीयले पाठी.......14
आला ऐरावत घेऊनी
सजवी अंबारी घालोनी
कुंतीला मग वर बसवोनी
वाटीयली वाणे......15
धन्य धन्य ती कुंतीमाता
स्वर्ग आणिला भूवरीआता
गजगौरीचे व्रत आचरीता
लाभे जगी कीर्ती.....16
नवरात्र आणि भोंडल्याच्या या सगळ्या आठवणींसोबत आईच्या, लहानपणीच्या मैत्रिणींच्या, कराड च्या आठवणी हात धरुन आल्या. त्या सगळ्या सुंदर दिवसांसाठी परमेश्वराचे खूप खूप आभार. आता मागे बघताना असं वाटतंय की आपलं सगळं आयुष्य म्हणजे एकमेकांच्या हातात हात धरुन खेळलेला भोंडलाच आहे. आनंद, दु:ख, राग, प्रेम, प्रार्थना अशी सगळी गाणी आपण गात जातो. फक्त एक लक्षात ठेवायचं.सोबत असलेल्यांचा हात घट्ट घरुन ठेवला की रिंगणातुन बाहेर जायची भिती नाही.
हा आठवणींचा भोंडला माझ्या लाडक्या आईसाठी आणि आता आईच्या पश्चात माझ्यावर आईसारखंच प्रेम करणाऱ्या माझ्या सासुबाईंसाठी.
- ©स्मिता श्रीपाद
नवरात्र 2022

No comments:

Post a Comment