Wednesday, July 23, 2025

दक्षिणवारी - कूर्ग आणि हारांगीचे हत्तीदादा

 दक्षिणवारी - कूर्ग आणि हारांगीचे हत्तीदादा



उटी ला निरोप देऊन आज कूर्ग कडे जायचं होतं. तामिळनाडूमधून...कर्नाटकात... पुण्यातून जाताना मी लेकीला एकदम उत्साहात सांगितलं होतं की "आता बघ तुला कन्नड, तामिळ अशा वेगळ्या भाषा ऐकायला मिळतील हं" पण जिथे जाऊ तिथे कानावर मराठीच भाषा ऐकायला येत होती किंवा गुजराथी तरी 😀. दुकानं किंवा हॉटेल मध्ये हिंदी आणि इंग्रजीच जास्त. नाही म्हणायला आमचे ड्रायव्हर दादा अधून मधून फोन वर कन्नड बोलायचे तेवढंच.तर ते असो.
उटी ते कूर्ग परत एकदा बंदीपूर मदुमलाई आणि मैसूर मार्गेच रस्ता होता. परत प्राणी दिसण्याची शक्यता. या रस्त्यावर वाटेत पाईन फॉरेस्ट लागतं तसंच बऱ्याच हिंदी चित्रपटात दिसलेला एक शूटिंग पॉईंट पण लागतो. पण आज पाऊस महाराज सकाळपासूनच पडत होते त्यामुळे या दोन्ही ठिकाणी व्यवस्थित चिखल होता. लांबूनच हे पॉईंट्स बघितले आणि आजचा प्रवास जास्त असल्याने कुठे न रेंगाळता पुढे निघालो.
वाटेत नीलगिरी चं जंगल लागलं. प्रचंड मोठे नीलगिरी वृक्ष दिसायला लागले. पाऊस आणि धुक्यामुळे भर दिवसा इथे अंधारून आलेलं होतं.
'नीलगिरी' नावाची एक गंमत 'एका रानवेड्याची शोधयात्रा' पुस्तकात मी वाचली होती ती सांगते. नीलगिरी पर्वतरांगांना "नीलगिरी" हे नाव का आहे तर तिथे प्रचंड प्रमाणात असलेल्या नीलगिरी च्या झाडांमुळे असं बरेच जणांना वाटत असेल किंवा काही ठिकाणी तसे उल्लेख पण आहेत. पण ते तसं नाही. या नावामागचं कारण वेगळंच आहे. या सगळ्या पर्वतरांगांवर कुरुंजी नावाचं एक झुडूप उगवतं. साधारण गुडघ्या एवढ्या उंचीचं हे झाड. महाराष्ट्रात सुद्धा भीमाशंकर च्या आसपास हे झाड उगवतं. हे झाड रुजल्यापासून बरोब्बर बारा वर्षांनी याला फुलांचा बहर येतो. निळ्या रंगाची ही फुलं अतिशय सुंदर असतात म्हणे. तर या निळ्या फुलांनी आच्छादलेले डोंगर म्हणून या डोंगरांना नीलगिरी असं नाव पडलं म्हणे. नीलगिरी नावानं जे झाड आपण ओळखतो (ज्याच्यापासून तेल मिळतं) त्याचं इंग्रजी नाव Eucalyptus ( यूकेलिप्टस ) हे मूळ झाड ब्रिटिशांनी भारतात आणलं आणि इथल्या उघड्या डोंगरांवर लावलं. या झाडाला मराठी नावच नव्हतं पण नीलगिरी डोंगरांवर उगवलेलं झाड म्हणून त्याचं नाव 'नीलगिरी' असं ठेवलं गेलं. आहे कि नाही गम्मत.
थोडक्यात काय तर झाडामुळे पर्वतरांगांना नीलगिरी असं म्हणत नाहीत तर पर्वतरांगांच्या नावामुळे झाडाला ते नाव आहे.कृष्णमेघ कुंटेंच्या पुस्तकात हे वाचायला मिळालं.
मैसूर मधून उटी ला येताना घाटात 36 हेअरपिन बेन्डस लागले होते पण त्यावेळी ते उत्साहाच्या भरात लवकर संपले. उटीहून परत जाताना वेगळ्याच घाट रस्त्याने आज आम्ही निघालो होतो. उटी ला यायचा आणि जायचा रस्ता वेगळा आहे असं वसंत कुमार म्हणाला. या दुसऱ्या घाटातली वळणं जास्त भयानक होती. खरंतर मला घाटात कधीच विशेष त्रास होत नाही पण आज प्रचंड गरगरायला लागलं.कधी एकदा घाट संपेल असं झालं. घाट उतरून खालच्या एका गावात थोडा ब्रेक घेतला. डोकं शांत केलं आणि पुढे निघालो.
आता परत जंगलाचे रस्ते. आज कोणते प्राणी दिसणार बरं ? आज आधी लागलं मदुमलाई. सकाळची फ्रेश वेळ आणि पाऊसामुळं धुवून निघालेलं ताजं ताजं जंगल. इथे जंगल सफारी करायची अशी लेकीची फार इच्छा होती पण प्लॅन बनवताना जिप्सी चे बुकिंग मिळाले नव्हते आणि मिळाले असते तरी पावसामुळे कितपत जमलं असतं देव जाणे.
आज सगळ्यात आधी दर्शन दिलं मोराने. सकाळच्या कोवळ्या उन्हात एका तुटलेल्या झाडावर मस्त ऐटदार पणे बसला होता. गर्द निळी मान डौलदार पणे हलवत इकडे तिकडे बघत होता. तिथून पुढे आलो तर मसिनागुडी, थेप्पाकडू, सिल्वन लॉज अशी नाव असलेले बोर्ड दिसायला लागले. हे सगळं मी "एका रानवेड्याची शोधयात्रा" पुस्तकात वाचलेले शब्द होते. एकदम ओळखीचं काहीतरी भेटल्यासारखं वाटलं. इथे जंगलात एक रात्र राहायचा प्लॅन करायलाच हवा होता असं राहून राहून वाटलं. ( इथे परत येण्यासाठी कारण हवंच कि ) थोडं पुढे गेलो तर परत हरणांचे कळप, माकडं हे नेहेमीचे यशस्वी कलाकार दिसलेच. माझी नजर हत्तींना शोधात होती पण ते काही दिसेनात. परत एकदा अजून 1-2 मोर दिसले. आता बंदीपूर ची पण हद्द संपत आली. जंगलाचा रस्ता संपणार म्हणून मला वाईट वाटायला लागलं.शेवटच्या टप्प्यात काही दिसतंय का म्हणून सगळा जीव डोळ्यात आणून मी पाहत होते आणि इतक्यात...
डावीकडच्या झुडपात ...चक्क अस्वल...
अस्वल जंगलात दिसणं अगदी वाघाइतकंच दुर्मिळ असतं कारण अस्वल हा खूप लाजाळू प्राणी आहे असं म्हणतात. जंगल सफारी मध्ये पण सहज दिसत नाही.पण आमची इच्छाशक्ती आणि नशीब जोरावर होतं. गाडी स्लो करून आम्ही अस्वल बघायला लागलो. रस्त्याच्या अगदी कडेलाच आलं होतं. बहुतेक त्याला रस्ता क्रॉस करायचा असावा. तेवढ्यात पुढच्या कार वाल्याने मूर्खासारखा हॉर्न वाजवला आणि त्याक्षणी उलटं वळून दाट जंगलात ते पळून गेलं. माणसं शहाण्यासारखी का वागत नाहीत ? असो.
जंगल रस्त्याची सांगता मस्त झाली होती. सफारी बुकिंग न करता येता जाताना भरपूर प्राणी बघायला मिळाले होते. आता जंगल संपलं आणि मी जे डोळे मिटले ते थेट जेवायला हॉटेल आल्यावरच उठले. मस्त झोप झाली होती.
छानपैकी साऊथ इंडियन थाळीवर ताव मारला आणि कूर्ग च्या रस्त्याला लागलो.
आपल्याकडे अजून वेळ आहे तर आज तुम्हाला हत्तींच्या कॅम्प वर घेऊन जातो असं वसंत कुमार जेवण झाल्यावर म्हणाला. त्यानुसार कूर्ग मधल्या प्रसिद्ध दुबारे कॅम्प ला जायचं असं आम्हाला वाटलं. पण साधारण दीड-दोन तासांनी त्याने आम्हाला एका वेगळ्याच कॅम्प वर नेलं. दुबारे कॅम्प खूप गर्दीचा आहे. मी तुम्हाला दुसऱ्या छान जागी घेऊन जातो असं म्हणून तो आम्हाला घेऊन पोचला "हारांगी एलिफन्ट कॅम्प" ला. पार्किंग पासून साधारण 500-800 मीटर चालत जायला लागणार होतं. पण आत जायचा रस्ता मस्त गर्द झाडातून होता. वाटेत एक छोटं तळं लागलं आणि एक ट्री हाऊस सुद्धा. चालत चालत 10-15 मिनिटात कॅम्प वर पोचलो आणि तिथला नजारा बघून आहाहा असं झालं. समोर विस्तीर्ण पसरलेला जलाशय होता आणि त्याच्या काठावर डावीकडे 7-8 हत्ती मस्त डुलत होते. हारांगी धरणाचं हे बॅकवॉटर होतं असं नंतर कळलं. पाण्यात बोटिंगची सोय होती त्यामुळे कन्या डबल खुश झाली. आधी हत्तीदादांकडे मोर्चा वळवला. संध्याकाळी 5 ते 6 ही हत्तीची खाण्याची वेळ होती म्हणे. तिथे मिळणार चारा घेऊन आपण हत्तींना खायला घालू शकतो. तो चारा विकत घेऊन आम्ही पण हत्तींना खाऊ घातला. हत्ती बघायला मला फार आवडतं. खूप उन्हाळे, पावसाळे बघून आयुष्याचा अनुभव घेतलेल्या, सगळे दात पडल्यामुळे तोंडचं बोळकं झालेल्या घरातल्या जेष्ठ आजोबांसारखे दिसतात काही हत्ती. आणि जे लहान पिल्लू हत्ती असतात ते अजून दात न आलेल्या छोट्या बाळांसारखे दिसतात. त्यांच्या सोंडेला किंवा पाठीला स्पर्श केल्यावर एक खरबरीतपणा किंवा सुरकुत्या जाणवतात. अशावेळी हत्ती अजूनच मायाळू वाटतात.मला हि जागा फार फार आवडली. हिरवंगार पठार, आजूबाजूला भरपूर झाडी, शेजारीच विस्तीर्ण जलाशय आणि वरती निळंभोर आकाश. या सगळया चित्रात करड्या काळ्या रंगांचे हत्ती अगदी शोभून दिसत होते.भरभराटीचे प्रतीक असलेले हे गजांतलक्ष्मी आणि आजूबाजूला पसरलेला निसर्गाचा खजिना. खूप वेळ तिकडे रेंगाळून मग बोटिंग करायला गेलो.


"टोवेबल बोट" अशी कोणतीशी राईड लेकीनं आणि नवऱ्यानं सिलेक्ट केली. ती बोट नक्की सेफ आहे ना असं मी तिथल्या बाईला किमान 10 वेळा तरी विचारलं. तिनं काही काळजी न करण्याचं आश्वासन दिल्यावर आम्ही पैसे भरले. मग एका कसल्यातरी कन्सेंट फॉर्मवर आमच्या सह्या घेतल्या. मग परत अजून एकदा सेफ्टी बद्दल तिचं डोकं खाल्लं तेव्हा ती म्हणाली, " गेल्या 2 वर्षात काही प्राब्लेम आलेला नाही पण फॉर्मॅलिटी म्हणून सह्या घेतोय" आता काय बोलणार.देवाचं नाव घेऊन लाईफ जॅकेट चढवले आणि बोटीत बसलो. सोफ्याच्या आकाराची बोट आणि त्यात धरायला हॅन्डल. बाकी सगळीकडून उघडीच. हात घट्ट धरून ठेवायचे. धाडस करून आत बसले. नवरा आणि लेक निवांत. हि बोट दुसऱ्या एका मोटारबोटला जोडून आम्ही निघालो. एकदा पाण्यात शिरल्यावर भीती कमी झाली कारण आजूबाजूचा नजारा अप्रतिम होता. पाण्याचे तुषार अंगावर उडत होते. पाण्यातून हारांगी धरणाची भिंत पण दिसली. फक्त हे सगळं कॅमेरा मध्ये साठवण्यासाठी जवळ मोबाईल घेता आला नव्हता. शेवटी परत आणताना बोट वाल्या दादांनी करामती सुरु केल्या आणि बोट हलायला डुलायला लागली. नवरा आणि लेक मजा करत होते पण माझा ओरडून किंचाळून घसा दुखायला लागला. शेवटी आलो बाबा किनाऱ्यावर. बोट वाल्या दादांना त्यांच्या मोबाईल मध्ये आमचा एक फोटो काढायची विनंती केली आणि त्यांनी खरंच फोटो काढून दोन दिवसांनी पाठवला.
एव्हाना सूर्यास्त व्हायला लागला होता. त्या जागेतून हलूच नये असं वाटत होतं पण अजून कूर्ग च्या हॉटेल वर जायला एक तासाचा रास्ता होता. अजून थोडं रेंगाळून हत्तींना टाटा करून परत फिरलो. येताना जोरदार पावसानं झोडपलं पण आमच्या कडच्या छत्री मुळे न भिजता पार्किंग ला पोचलो.
कूर्ग चे सुंदर रस्ते सुरु झाले. एक - दीड तासाचा प्रवास करून कॉफी मळ्यातल्या आमच्या हॉटेल वर पोचलो.
आज भरपुर दमलो होतो. हॉटेल वर पोचून फ्रेश होऊन जेवण केलं आणि गुडूप झालो.
-©️स्मिता श्रीपाद

No comments:

Post a Comment