"Article 370"
मै तुझे फीर मिलूंगा, अभी जाने दे मुझे
रब के पास जाकर, नई तकदीरे लिखाकर
किसी मोड पे फिर मिलूंगा, अभी जाने दे मुझे
पुलवामा हल्ल्यात शाहिद झालेल्या 40 जवानांच्या शवपेट्या आणि त्त्यांना पाणावलेल्या डोळ्यांनी अंतिम निरोप देणारे त्यांचे प्रियजन असं दृश्य पडद्यावर दिसतं. मागे हे गाणं चालू असतं. डोळे वाहायला सुरुवात होते. पडद्यावरचं चित्र धूसर होतं. मध्यंतर झालं तरी खुर्चीमधून उठावंस वाटत नाही.
"आर्टिकल 370......"
'आई, आपण आर्टिकल 370 बघायला जाऊयात का ?'
असं लेक काल म्हणाली.
खरंतर 370 बद्दल मलापण फार काही माहिती नव्हतं. काश्मीर बद्दल काहीतरी....इतकंच.तिच्या वयाला बघता येईल का एवढी चौकशी केली आणि चित्रपट बघून आलो. प्रत्येकाने आवर्जून बघावा असा चित्रपट.
दोन वर्षांपूर्वी काश्मीर भेट देऊन आले तेव्हा आवर्जून लाल चौकात गेले होते. तिथं दिमाखानं मिरवणारा आपला तिरंगा पाहिला होता. आणि 3 तास मुक्तपणे मी त्या चौकात का फिरू शकले याचं नीट उत्तर काल चित्रपट पाहिल्यावर मिळालं.
4 ऑगस्ट 2019... माझ्या साठी कधीच विसरता येणार नाही अशी तारीख. आई अचानक सोडून गेल्यामुळे माझ्या वैयक्तिक आयुष्यात झालेली उलथापालथ. त्यामुळे 4 ऑगस्ट आणि त्यानंतरचे कित्येक दिवस सगळ्या जगाशी संपर्क तुटल्यासारखं झालं होतं. त्यावेळी नेमकं काय काय घडत होतं ते काल पडद्यावर दिसलं.आजपासून 4 ऑगस्ट आणि 5 ऑगस्ट 2019 या तारखा अजून एका कारणासाठी कायम लक्षात राहतील.
आता जेव्हा जेव्हा अखंड भारताचा नकाशा पाहीन तेव्हा त्यामागची भावना मी कधीच विसरणार नाही.
आपल्या मुलांना हे सगळं कळलं पाहिजे. त्यामुळे 13-14 वर्षांच्या मुलांना इच्छा असेल तर जरूर हा चित्रपट दाखवा.
कितनी खूबसूरत ये तस्वीर है..ये कश्मीर है,ये कश्मीर है..
'आपलं' काश्मीर सर्वार्थानं कायम खूबसूरत राहो..
आता कुठले डाग नकोत....


No comments:
Post a Comment