Wednesday, July 23, 2025

"आजीची कढई आणि हमखास जमणारे पदार्थ"

 "आजीची कढई आणि हमखास जमणारे पदार्थ"



2020 सालच्या मे महिन्यात कोविड ऐन भरात असताना मी एक आठवडा कराड ला आज्जीकडं राहायला होते. तिला मदत म्हणून गेले होते. आज्जी खूप आजारी होती तेव्हा. सतत ताप यायचा, तपासण्या चालू होत्या. पण तरी त्यातूनही माझे लाड चालू होते. तिच्या मदतीला म्हणून मी जाऊन राहिले होते तरी स्वयंपाकघरात खुर्चीवर बसून माझ्याकडून तिच्या पद्धतीचे पदार्थ बनवून घेऊन मला खाऊ घालायची. मी तिच्यासाठी बनवलेले सूप वगैरे आवडीनं खायची.
"तुझ्या कढयांमुळे पदार्थ छान बनतात" असं म्हणालं कि हसायची.
तिला जो काही आजार झालेला तो गंभीर आहे हे बहुतेक डॉक्टरांनी सांगायच्या आधीच तिच्या लक्षात आलं होतं त्यामुळे थोडीफार निरवानिरवीची भाषा करायची.
तिची हि मोठी कढई त्यावेळी परत घरी जाताना आवर्जून तिनं मला दिली. "याचा आता मला फारसा काही उपयोग नाही. तुला घेऊन जा" असं म्हणून न विसरता माझ्या सामानात ठेवली होती.
अखंड माणसं येणारं जाणारं असं आमच्या आज्जीचं घर असूनही त्या कढईचा आता उपयोग नाही असं तिनं म्हटल्यावर मला आत कुठंतरी तुटलं खरंतर.आजीची आठवण आली कि हे असं होतं. डोळे भरून येतात टचकन.असो.
तर तीच ही कढई... आज्जीने स्वतः च्या हाताने मला दिलेली तिची शेवटची भेट... तिची लीगसी... तिचा सुगरणीचा हात...🙌🤗
हि कढई अगदी खास वस्तू बनवण्यासाठी मी वापरते. आणि माझी भाबडी समजूत म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा पण यात कोणताही पदार्थ केला तरी तो कधीही चुकत नाही उलट मस्त चवदार होतो.
अगदी रोजच्या कढईत केलेले पोहे आणि या कढईत केलेले पोहे सुद्धा वेगळे लागतात. पाहुणे आलेले असतील तर आवर्जून यातच पोहे करायचे असं माझं शास्त्र आहे 😜. दिवाळीचा चिवडा, सांबर, मिसळ, पुरण, जास्त लोक असतील तेव्हा भाज्या आमट्या असे अनेक पदार्थ या कढईत घडतात.
अजून एक म्हणजे माझ्या घरी अंड्याचे पदार्थ किंवा तत्सम नॉन व्हेज बनणार असेल तर या कढईला अज्जीबात हात लावायचा नाही असा माझा मीच नियम केलाय. आज्जीनं आयुष्यभर जो स्वयंपाक केला तो देवाचा नैवेद्य समजून केला त्यामुळे तिची भांडी अशा कारणांसाठी वापरली तर तिला वाईट वाटेल असं मला नेहेमी वाटतं.
गेली अनेक वर्ष आजी, आई, सासूबाई यांच्या हातचे मऊसूत रवा लाडू खात आले आहे. मागे अनेक वर्षांपूर्वी एकदा स्वतः करायचा प्रयत्न केलेला पण एकतारी पाकाचे तीनतेरा वाजले त्यामुळे तो विषय option ला टाकला. सासूबाई झक्कास लाडू करतात मग कशाला कष्ट. पण या दिवाळीत धीर करून आजीच्या याच कढईत रवा नारळ लाडू करायला घेतले. 'सांभाळून घे गं आज्जी' असं म्हणून पाकात रवा घातला आणि मस्त खुटखुटीत लाडू तयार. माझी मीच खुश. लेकीने आवडीने खाल्ले आणि परत लाडू ची फर्माईश आली. सासूबाईंनी पण दिवाळीत शाब्बासकी दिली.
आज परत एकदा रवा खवा लाडू करून झालेत.आता पाकाची भीती गेलीच. आजीची कढई असताना कसली भीती? अनेक वर्ष निगुतीनं वापरलेली अन्नपूर्णेची ही वस्तू... निर्जीव म्हणायला नुसतं...पण कोण जाणे आजीच्या हातची जादू आणि आशीर्वाद तिच्यात असणारच असणार असा माझा ठाम विश्वास आहे.
अशी हि माझ्या आजीची जादूची कढई...
काय मग येताय का मस्त ताजा लाडू खायला ? 😀
-©️स्मिता श्रीपाद

No comments:

Post a Comment