आजी
तिच्या साडीचा मऊसूत पदर..
तिच्या भोवती फिरणारा वास..गोडसर
तिचा सायी सारखा स्निग्ध तळहात..
आणि तिची मिठी..घट्ट..उबदार
ताक घुसळताना होणारा नाद..
लोणी साखरेची इवलीशी वाटी..
स्वयंपाक घरातली गोड गुणगुण..
आणि देवघरातली फुलांची दाटी
रात्री कुशीत घेऊन मारलेल्या गप्पा,
परी, चिमणी आणि राजाची गोष्ट..
पत्ते, काचाकवड्या चा तासनतास खेळ,
आणि चेहेऱ्यावर हात फिरवून काढलेली दृष्ट
औक्षण करताना टाकलेल्या अक्षता
तिच्या डोळ्यात लुकलुकणारे दिवे
पाठीवर थाप मारत दिलेला आशीर्वाद
यशवंत ,औक्षवंत, सुखी व्हावे
वाळवण आणि उन्हाळ्याची सुट्टी,
भेळ, आंबे , पन्ह आणि कैरी
तिच्या हाताचा दैवी आमटी भात
पापड मसाल्याची बांधून दिलेली शिदोरी
पण मग... एक आजी जाते तेव्हा..
ती तिच्यासोबत घेऊन जाते का?
हा सगळा खजिना ?
मुळीच नाही..
ती खरंतर देऊन जाते तिच्यातल बरंचस काही
आपल्या ओटीत..खण नारळाच्या सोबतीने...
तिच्यातलं आज्जीपण
सापडतं मग आपल्याला हळूहळू...
कधी आमटीच्या खमंग फोडणीत,
कधी शांत तेवणाऱ्या निरंजनात
तर कधी ताकावर आलेल्या लोण्यात..
- स्मिता श्रीपाद
( आज जागतिक कविता दिन. हे खास माझ्या आजी साठी 
)


No comments:
Post a Comment