प्रबोधिनीत यायचे समर्थ व्हावया...
'समर्थ' व्हायचे म्हणजे नक्की काय ? आणि ते ठरवायचं कसं ?
आमच्या ज्ञान प्रबोधिनी प्रशालेतल्या नुकत्याच नववी मध्ये गेलेल्या 13-14 वर्षांच्या मुली जेव्हा आपल्यापेक्षा लहान (इयत्ता तिसरी ते पाचवी) अशा सुमारे वीसपेक्षा जास्त मुलींचं 4 दिवसाचं शिबीर आयोजित करतात आणि उत्तमपणे पार पडतात तेव्हा या मुलींचं मनापासून कौतुक वाटतं. समर्थ होण्याच्या दिशेने छोटंसं पाऊल म्हणूयात का ?
आज शिबिराचा शेवटचा दिवस म्हणून मुद्दाम शाळेत गेले होते. शिबीर संपल्यावर शिबिरार्थींना घ्यायला आलेले पालक या सगळ्या तायांचं मनापासून कौतुक करत होते. छोट्या छोट्या मुलींनी तायांसाठी भेटवस्तू आणल्या होत्या ( विशेष म्हणजे तायांनी भेटवस्तू घ्यायला नकार दिला. असं वस्तू घेणं आम्हाला योग्य वाटत नाही म्हणाल्या
) आणि पुढचं शिबीर पुढच्या सुट्टीत नक्की घ्या असं पालक आणि छोट्या मुली आवर्जून सांगून गेल्या.

एखादी कल्पना सुचणे, ती सर्वांनी उचलून धरणे आणि एकमेकींच्या सहकार्यांनी नीट पार पाडणे अशा बऱ्याच गोष्टी या मुली शिकल्या असतील. अगदी गुगल फॉर्म वापरून शिबिराची नोंदणी घेणे, चार दिवसांचे सर्व नियोजन, नोंदणी शुल्काचा हिशोब असं सगळं मुलींना शिकायला मिळालं. या शिबिराचे संपूर्ण नियोजन जरी मुलींचे असले तरी अर्थातच ज्ञान प्रबोधिनी युवती विभागातल्या तायांचे आत्तापर्यंत मिळालेले मार्गदर्शन, दलावर चालणारे उपक्रम आणि त्यात शिकलेल्या गोष्टींची सांगड घालूनच मुली हे करू शकल्या.
फूल फूल गुंफुनीच माळ होतसे
थेंब थेंब झेलुनी, झरा वहातसे
मोकळ्या मनी, प्रेम फुलवुनी
माळा गुंफू या, या साखळी जोडूया
आपण जे शिकलोय ते पुढे पोचवण्यासाठी विचारांची आणि कृतीची साखळी कशी जोडायची हे या मुलींना छान कळायला लागलंय याचा आनंद आहे.असे उपक्रम करण्यासाठी मुलींना नेहेमी प्रोत्साहन देणाऱ्या युवती विभागाचे आणि प्रशालेचे खूप खूप आभार.
-स्मिता श्रीपाद
No comments:
Post a Comment