भेटे मग तो विठुराया
चंद्रभागा मी पुलकित काया
हीच घडी भाग्याची
वाट पाहे पंढरीची
अशा ओळींवर आम्ही गात असताना बेडरिडन असलेले, नाकाला oxygen ची नळी लावलेले एक आजोबा एकदम उत्सुर्तपणे टाळ्या वाजवायला लागले आणि माझ्या घशात एकदम आवंढाच दाटून आला. पुढचं गाणं गाताच येईना.
"Cipla palliative cancer center" पुणे इथं ज्ञानप्रबोधिनी पालक अभिव्यक्ती संघातर्फे कॅन्सर पेशंट्स साठी एक छोटासा कार्यक्रम सादर करायला आज आम्ही गेलो होतो.हा कार्यक्रम पूर्वी आम्ही मोठ्या सभागृहात भरपूर प्रेक्षकांसमोर केला होता पण यावेळी आमचे प्रेक्षक वेगळे होते. व्हीलचेअर किंवा थेट चाकाच्या बेडवर झोपून आलेले पेशंट समोर बसून आम्हाला दाद देत होते तेव्हा काय वाटलं शब्दात सांगताच येणार नाही. या सगळ्यांनी वाजवलेल्या टाळ्या हे खूप मोठं पारितोषिक वाटलं.
इतके दिवस ऑफिस, घर सगळं सांभाळून धावपळ करत केलेला सराव सार्थकी लागला असं वाटलं. खरंतर "धावपळ होते" अशी तक्रार करण्याला पण काहीच अर्थ नाही कारण अशी धावपळ करण्यासाठी आपण हातीपायी सक्षम आहोत ही केवढी मोठी परमेश्वरी कृपा आहे हे तिथं गेल्यावर प्रकर्षानं जाणवलं.
आजच्या त्या अर्ध्या तासाच्या कार्यक्रमात तिथल्या सर्व रुग्णांना थोडातरी आनंद आम्ही देऊ शकलो असू अशी आशा आहे. ही संधी आम्हाला दिल्याबद्दल Cipla चे मनापासून आभार. या रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या तिथल्या डॉक्टर आणि इतर सपोर्ट स्टाफ च्या चमू ला मनापासून दंडवत.

13 जानेवारी 2024
No comments:
Post a Comment