Tuesday, July 22, 2025

अंजली आज्जी

 माहेरची सगळ्यात मोठी लेक “आक्का” ते सासरची सगळ्यात धाकटी सुनबाई “अंजली” असं मोठं अंतर पार करणं आणि ते निभावणं सोपी गोष्ट नाही. पण माझ्या सासूबाई, माझ्यासाठी ‘अंजली आज्जी’ गेली अनेक वर्षे, कदाचित तिच्याही नकळत हे मोठेपण आणि लहानपण लीलया सांभाळते आहे.

लहानपणापासून अंजली आज्जी, आईची मामी अशी ओळख मोठेपणी सासूबाई अशा नात्यात बदलली, पण ती बाहेरच्या जगासाठी. लग्नानंतर मी तिला आज्जी म्हणायचं सोडलं नाही आणि तिनं पण कधीच आज्जीपण सोडलं नाही. सासुगिरी तिला कधी जमली नाही आणि जमणार पण नाही. कारण पोटात असलेली अमाप माया.
पुण्यात शिकायला आल्यावर पाहिजे 8 दिवस हॉस्टेल वर राहून पहिल्या शनिवारी जेव्हा अंजली आज्जी कडं राहायला गेले तेव्हा स्वतः च्या हाताने वरण भात कालवून तिनं माझ्या हातात ताटली ठेवली होती. त्याक्षणी घशात आलेला आवंढा मी अजूनही विसरू शकले नाहीये.
तेव्हापासून अजूनही कधीही गरम भाकरी करताना, “तू आधी खाऊन घे. तव्यावरची ताटात भाकरी आवडते ना तुला” असं म्हणत माझ्या पानात जेव्हा ती गरम भाकरी घालते तेव्हा न चुकता घशात आवंढा दाटून येतो.
घरात सतत येणारी जाणारी सासर माहेरची माणसं, शिक्षणासाठी राहणारे विद्यार्थी, आजारपणात विश्रांती ला आलेली जेष्ठ मंडळी या सर्वांना भाऊ आजोबांचं घर आपलंस आणि हक्काचं वाटतं याचं खूप मोठं श्रेय खरंतर घराच्या गृहिणीचं म्हणजे आमच्या अंजली आज्जीचं आहे.
भक्तांसाठी सदैव उभा विठुराया पंढरपुरात दिसतो पण त्याच्या मागे खंबीर पणे रखुमाई उभी असते आणि त्याचा संसार सांभाळत असते म्हणूनच जगाचा गाडा ओढणं त्याला जमत.
आमच्या भाऊ आजोबांची रखुमाई सदैव अशी त्यांच्या पाठीशी आहे.
आजच्या वाढदिवशी सौ अंजली आज्जीला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो अशी श्री विठ्ठल रखुमाईच्या चरणी प्रार्थना 🙏🏻
जीवेत शरद: शतम् 🙏🏻
- स्मिता श्रीपाद
26 सप्टेंबर 2023

No comments:

Post a Comment