माझ्या आजी आजोबांच्या घरी कधीही गेलं कि दर्शनी भागात लावलेली छोटी फ्रेम सर्वात प्रथम दिसायची...त्यावर लिहिलेलं असायचं
"हे घर श्रीरामाचे आहे.
आम्ही श्रीरामाच्या घरात राहतो"
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची दीक्षा घेतलेले माझे आजी आजोबा कोणतंही काम करताना मुखाने अखंड रामाचं नाव घेत असत. काम नसेल आणि हात मोकळा असेल तेव्हा हातात माळ आणि "श्रीराम जय राम जय जय राम" चा जप.
सकाळी उठल्यावर पहिला शब्द श्रीराम आणि रात्री झोपताना
श्रीरामचंद्रा करुणासमुद्रा
ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा
नेत्री न येरे तुजवीण निद्रा
कधी भेटसी बा मजला सुभद्रा
माझ्याच नव्हे तर अशा अनेकांच्या घरी हेच चित्र अनेक वर्ष आहे. अजूनही आहे.
राजकारण वगैरे आम्हाला कळत नाही. त्यामुळे अयोध्येत मंदिर बांधल्यामुळे आणि त्याचा सोहळा केल्यामुळे समाजात धार्मिक तेढ कशी तयार होणार हे पण आम्हाला समजत नाही. उलट आम्हा सर्वांना एकत्र आणणारा सामान धागा म्हणजे "राम" आहे हे गेल्या काही दिवसात जाणवलं.
काल 22 जानेवारी ला दूरचित्रवाणी वर श्रीराम दिसले तेव्हा आजी आजोबांच्या आठवणी खूप दाटून आल्या मनात.
दिन हाका मारी, द्वारी तुझ्या हरी
कधी जाईल हाक, तुझ्या कानावरी,
नको अंत पाहू जीव घाबरला
किती विनवू तुला
रामा दयाघना
किती आळवू तुला
रामा दयाघना
हे भजन आठवलं एकदम.
अनेक भक्तांची,अनेक वर्षांची आर्त आळवणी ऐकून भव्य दिव्य रूपात रामरायाने दर्शन दिलं. आणि पुढची अनेक वर्षे तो असाच अखंड दिसत राहणार...त्याच्या हक्काच्या जागी.
कालचा दिवस अविस्मरणीय, अवर्णनीय होता. आपण त्याचे साक्षीदार होतो हे आपलं भाग्य.
ज्ञानप्रबोधिनी पालक अभिव्यक्ती गटातर्फे तर्फे "गीतरामायण" नावाचं शिवधनुष्य उचलायचं धाडस काल आम्ही केलं.आम्ही कितपत यशस्वी झालो हे माहित नाही पण आम्हाला मिळालेला आनंद लाखमोलाचा आहे आणि पुढची अनेक वर्षे कायम स्मरणात राहील यात शंका नाही.
'सरयू तीरावर अयोध्या', 'राम जन्माला गं सखी', जेष्ठ तुझा पुत्र मला', 'स्वयंवर झाले सीतेचे', 'नकोस नौके परत फिरू', 'पराधीन आहे जगती', 'तोडीत फुले मी', 'भूवरी रावण वध झाला' 'त्रिवार जयजयकार रामा’ अशी अनेक अजरामर गीते गाताना परत एकदा सगळं रामायण जगलो.
काल 'आमच्या' श्रीरामासाठी जो अभूतपूर्व सोहळा अयोध्येमध्ये घडला तो त्या रामरायानेच घडवून आणला. कारण जे काही होतं ते त्याच्याच इच्छेने हे नक्की.
भलेबुरे ते राम जाणता, आपण आपुले काम करू
श्रीरामाचे नाम गात या, श्रीरामाला पार करू
हेच आणि एवढंच सत्य आहे.
जय श्रीराम !!
-
स्मिता श्रीपाद

23 जानेवारी 2024
No comments:
Post a Comment