कुमाऊंच्या प्रदेशात - 6...समारोप
(कुमांऊ भटकंती चा समारोप करायला यावेळी काही ना काही कारणाने वेळ लागला त्यामुळे क्षमस्व. आज मुहूर्त मिळालाय त्यामुळे शेवटचा भाग लिहितेय.)
जंगलाची शांतता रात्रभर मनात झिरपत राहिली त्यामुळे झोप पण मस्त झाली. सकाळी लवकर चेक आऊट करून दिल्लीच्या दिशेने निघालो. मुंबईकरांचं विमान 8 वाजता आणि आमचं 9 वाजता होतं.दिल्ली च्या ट्राफिक पासून सुटका करून घेत वेळेत विमानतळावर पोचलो. परत एकदा सगळ्यांचा निरोप घेतला.
दिल्ली ट्राफिक च्या भीतीने खुप लवकर निघालो होतो त्यामुळे खूपच लवकर विमानतळावर पोचलो होतो. बॅग्स चेक-इन करायला गेलो तेव्हा एक गम्मतच झाली. आम्ही नैनिताल मध्ये पावसासाठी एक फोल्डिंग न होणारी सप्तरंगी छत्री घेतली होती. ती कोणत्याच बॅग मध्ये बसेना.चेक-इन काउंटर वर ती छत्री केबिन मध्ये नेऊ शकतो कि नाही यावर एक प्रदीर्ध चर्चासत्र पार पडलं.तिथल्या कोणालाच आजवर बहुतेक असे प्रवासी भेटलेले नसावेत. काउंटर स्टाफ ने आपल्या सिनिअर ना फोनाफोनी करायला सुरुवात केली. तोवर मागे लाईन वाढून लोक वैतागले.अखेर वरून निर्णय मिळाला आणि आमची ती मौल्यवान छत्री चेक-इन च्या सामानात पोचली. विस्तारा चा स्टाफ, आणि आमच्या मागे उभ्या समस्त जनतेने सुटकेचा निश्वास टाकला असावा
.
ठरलेल्या वेळी विमान उडालं आणि (छत्रीसह) आम्ही पुणे मुक्कामी पोचलो.
पहिल्यांदाच अशा एखाद्या कंपनी सोबत ग्रुप टूर ला गेलो होतो.ग्रुप टूर चे फायदे तोटे सगळे अनुभवून झाले. पण एकंदरीतच "साखरेची साल काढत बसायचं नाही" हे माझ्या सासर्यांचं लाडकं वाक्य मला अतिशय आवडतं आणि ते लक्षात ठेवलं कि वाईट गोष्टी जास्त वेळ लक्षात राहत नाहीत हे मी अनुभवलंय. त्यामुळे आत्ता याक्षणी ट्रिप मधले चांगले क्षण च लक्षात आहेत. अनुभवी, कायम मदतीला तत्पर टूर लीडर, आरामदायक बस, व्यवस्थित प्लॅन केलेली इटिनेररी, मस्त सहप्रवासी आणि उत्कृष्ट जेवण असा एकंदरीत छान अनुभव मिळाला.
(न आवडलेल्या गोष्टी थेट केसरी ला लिहून पाठवल्या आहेत त्यामुळे त्या इथे सांगत बसायची गरज वाटत नाहीये
)
जेवणाबद्दल स्वतंत्र लिहीन असं पहिल्या भागात म्हणाले होते. तर आता थोडं त्याबद्दल. आपण जिथे जाऊ तिथलं जेवण जेवून बघायला हवं असं पूर्वी मला वाटायचं. कश्मीर ला गेलो तेव्हा पहिले दोन दिवस तिथलं जेवण बरं वाटलं. नवेनवे प्रयोग केले पोटावर.पण नंतर नंतर तिथले वास, चवी नकोशा वाटायला लागल्या.आपल्या ओळखीचं काहीतरी खायला मिळावं असं वाटायला लागलं. नवीन ठिकाणी आणि लांबच्या प्रवासात अनोळखी चवी पोटाला झेपतीलच असं नाही.
यावेळी केसरी चा स्वतः चा शेफ सोबत होता त्यामुळे दिवसभर फिरून संध्याकाळी दमून जेव्हा आपण हॉटेल वर पोचतो तेव्हा आपल्या साधारण ओळखीचं आणि सवयीचं जेवण मिळालं कि पोट आणि मन दोन्ही तृप्त होतं असा अनुभव आला.त्यांच्या बुफे मध्ये शेव टोमॅटो भाजी, पालक पनीर असे आमच्या ओळखीचे पदार्थ असायचेच शिवाय तिथले काही खास लोकल पदार्थ जसं कि पहाडी रायता, त्यांची स्पेशल पहाडी आलू भाजी असे पण पदार्थ खायला मिळाले. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे नैनिताल मध्ये रोज रात्री गरमागरम फुलके मिळाले.दुपारचं जेवण बाहेर पहाडी पद्धतीचं आणि रात्री शेफ च्या हातचं. याशिवाय बसमध्ये बसलं कि रोज एक कोरड्या खाऊ चा पुडा, ड्राय फ्रुट्स, चिप्स असं रोज काही ना काही असायचंच. दिवसभर फिरताना जेवण सोडून अधेमधे भेळ, मोमोज, शिकंजी असे काही ना काही केसरी च्या भाषेत extra toppings पण असायचे. एकूणच खाण्यापिण्याची चंगळ होती.
अजून एक नवा अनुभव गाठीशी मिळाला. काही नवीन मित्रमंडळी भेटली.सुंदर आठवणी जमा केल्या.या सगळ्या लेखांच्या निमित्ताने परत एकदा फिरून आले.आता पुढचं लिखाण लवकरच करायला मिळो
.
तोवर... इति लेखनसीमा
-
स्मिता श्रीपाद
No comments:
Post a Comment